
मराठी साहित्यात आणि रंगभूमीत गूढकथांचा वेगळा आणि ठळक ठसा उमटवणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीला रंगमंचावरून सन्मानित करण्यासाठी ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ घेऊन येत आहे – ‘श्श… घाबरायचं नाही’. ही दोन अप्रतिम गूढ कथांची – ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ – नाट्यात्म प्रस्तुती आहे.
दिग्दर्शनाची धुरा ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. त्यांच्या सशक्त दिग्दर्शनात या दोन कथा केवळ रंगमंचीय प्रयोग न राहता, गूढतेचा, भीतीचा आणि उत्कंठेचा थरारक अनुभव बनून प्रेक्षकांसमोर उभ्या राहणार आहेत. या सादरीकरणात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे तीन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी – पुष्कर श्रोत्री, डॉ. श्वेता पेंडसे आणि डॉ. गिरीश ओक. या तिघांची रंगभूमीवरील अनुभवसंपन्नता, आवाजावरचं नियंत्रण आणि अभिनयातील सूक्ष्म भावविवेचन या कथांमध्ये नवजीवन फुंकणार आहे.
यापूर्वी देखील ‘38 कृष्ण व्हिला’ या गूढकथानाटकातून डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे यांना एकत्र काम करताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे. तर ‘अ परफेक्ट मर्डर’ मध्ये श्वेता पेंडसे आणि पुष्कर श्रोत्री यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ या नव्या सादरीकरणात या कलाकारांचे समन्वय, पूर्वानुभव आणि गूढतेची हाताळणी ही प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
रत्नाकर मतकरी यांच्या लेखनातील गूढतेला आधुनिक रंगभाषेची आणि तांत्रिक साज चढवून, ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने सादर केलेली ही कलाकृती म्हणजे एक प्रकारे त्यांच्या लेखनशैलीला रंगमंचावरची आदरांजलीच आहे. भीती, उत्कंठा आणि अंतर्मनाला भिडणारा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘श्श… घाबरायचं नाही’ चा प्रयोग अनुभवणे अनिवार्य आहे.