
मराठी रंगभूमीची परंपरा म्हणजे भावभावनांच्या विविध छटांची मांडणी करणारी, समाजमनावर प्रभाव टाकणारी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. याच परंपरेला सन्मानपूर्वक पुढे नेण्याचं काम आजवर अनेक नाटकांनी केलं असून, आता त्यात आणखी एका दर्जेदार नाटकाची भर पडते आहे, ती म्हणजे ‘भूमिका’ या कलाकृतीची.
विशेष म्हणजे हे नाटक केवळ एका नव्या कथानकाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तब्बल २१ वर्षांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे परतणाऱ्या अभिनेते सचिन खेडेकर यांच्या पुनरागमनाचीही साक्ष देणारं आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘अस्तित्व’, ‘टेक केअर गुड नाईट’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या खेडेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली होती. यानंतर हिंदीसह इतर भाषांतील सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण त्यांच्या चाहत्यांसाठी रंगभूमीवर त्यांना पाहणं ही एक मोठी उत्सुकता असते आणि ती आता ‘भूमिका’मधून पूर्ण होत आहे.
‘भूमिका’ या नाटकाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे – ज्यांनी नुकत्याच गाजलेल्या ‘छावा’ सिनेमासाठी गीतकाराची म्हणून काम केले आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी आहे ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’ यांसारख्या नाटकांनी रसिकांची मनं जिंकणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनयाचा कणाकणात भिनवणाऱ्या सचिन खेडेकर यांची ही उत्तम कलाकृती रंगभूमीवर एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणार आहे, यात शंका नाही.
नाटकाची कथा सामान्य आयुष्यातील असामान्य प्रवास अधोरेखित करते. प्रत्येक माणसाच्या वाट्याला एक भूमिका येतेच आणि ती निभावताना तो नकळतपणे एक कलावंत होतो. हे सांगत ‘भूमिका’ आपल्या अस्तित्वाच्या, आत्मभानाच्या आणि नात्यांची शिदोरी अलगद उघडते. या नाटकात ‘उल्का’ ही एका गृहिणी स्त्रीची व्यक्तिरेखा उभारली आहे. स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणारी, स्वतंत्र भूमिका निभावणारी स्त्री. अभिनेत्री समिधा गुरु या भूमिकेत दिसणार असून, ती ही भूमिका आपल्या करिअरमधील एक मैलाचा दगड ठरेल, असं स्पष्टपणे सांगते. उल्काच्या स्वभावात असलेले कंगोरे, तिचं नवऱ्याशी असलेलं नातं, समाजापुढे मत मांडण्याचं धैर्य – या सगळ्यांचा प्रत्यय ‘भूमिका’मधून प्रेक्षकांना येणार आहे.
‘जिगिषा’ आणि ‘अष्टविनायक’ या दोन अनुभवी निर्मितीसंस्थांनी ‘भूमिका’च्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. याआधी त्यांनी ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘आज्जीबाई जोरात’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती केली असून, या नाटकातूनही तीच गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एकंदरीतच, ‘भूमिका’ हे नाटक म्हणजे अनुभवांची गुंफण, अभिव्यक्तीचं सामर्थ्य आणि अभिनयाच्या माध्यमातून मनात घर करणारी कलाकृती आहे. सचिन खेडेकर यांच्या पुनरागमनामुळे याचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. रंगभूमीवर येणारा हा अनुभव रसिक प्रेक्षकांसाठी नक्कीच एका नव्या विचारप्रवृत्तीचा आरसा ठरणार आहे. ‘भूमिका’ केवळ नाटक नाही, ती आयुष्यातील प्रत्येकाच्या ‘भूमिका’ची एक प्रामाणिक मांडणी आहे.