छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. ही गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन ही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच राज्याचे संस्कृती कार्य मंत्री आशिष शेलार आणि त्यांचा विभाग, पर्यटन विभाग यांचे अभिनंदन करतो.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. तसेच या पहिल्याच सर्किट यात्रेत प्रवास करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *