शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी दिली जावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी संदर्भात राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सुकानु समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी आणि राज्यातील सर्व प्रमुख शासकीय विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.