मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न
आजचा दिवस इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. एकाच इमारतीत १२ राज्यातील १२ समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचे समाज भवन प्रथमच साकारले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार वडवली येथील समाज भवनाच्या भूमिपूजन समारंभात केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे महापालिका क्षेत्रातील, ओवळा-माजिवडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, परिषा सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. एका बाजूला डोंगर, मध्ये खाडी, त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळीकडे उपलब्ध होत नाही. ते ठाण्यात उपलब्ध आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे. त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले.
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही आज कऱण्यात आले. १२ समाजाचे मिळून समाज भवनाचेही भूमिपूजन केले. ठाणे खरेच खूप बदलते आहे. ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
मुंबई-ठाण्यात जागा मिळणे कठीण आहे. पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजांसाठी हे भवन उभे राहणार आहे. प्रत्येक समाजाला तीन हजार फूटांची जागा मिळणार आहे. प्रत्येक मजल्यावर दोन समाजांसाठी जागा असेल. त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणे, ती उत्तम ठेवणे आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणे, ही सर्व समाजांची जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्व समाजांशी संपर्क असायचा. तीच शिकवण त्यांनी आम्हाला दिली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर अतिशय प्रेम होते. त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्याचबरोबर “मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे” या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे. त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे. वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. घोडबंदर रस्ता मोठा होणार आहे. गायमुख ते फाऊंटन भुयारी मार्ग, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, आनंदनगर-गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. याचा फायदा ठाणेकरांना होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे बदलत असल्याचे आपल्याला सगळीकडे दिसत आहे. या विकासाने ठाण्यात सोनेरी कळस गाठला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले. तर, सर्व प्रकल्पांसाठी निधी देणारे हे दिलदार मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सहकार्याने सगळे प्रकल्प मार्गी लागत आहेत, असेही ते म्हणाले.
तब्बल 12 समाजांना सामावून घेणारे समाज भवन ही अनोखी गोष्ट आहे. ही वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.
समाज भवनाच्या भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गायमुख येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुख – टप्पा 2 चे लोकार्पण केले. तर, नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, त्या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले.
त्यापूर्वी डॉ.सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्राचे प्रत्यक्ष तिरंदाजी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लोकार्पण केले. त्यानंतर, स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समता नगर, राजीव गांधीनगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडांवरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खाजगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प, वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह आणि शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत प्रकल्प यांचे ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झाले.
या सोहळ्यात जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. त्याचे संयोजन जिम्नॅस्टिकमधील आंतराष्ट्रीय स्तरावरील पूजा आणि मानसी सुर्वे या खेळाडूंनी केले. या दोन्ही केंद्रांतील खेळाडू आतंरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.