
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ०३ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर प्रशासनामार्फत तातडीची कारवाई सुरू आहे. त्यानुसार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी बी.पी. रोड, शितल शॉपिंग सेंटरजवळील “द्वारका धाम” या धोकादायक इमारतीवर मिरा भाईंदर महानगरपालिकेने नियोजनबद्ध कारवाई केली. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या स्पष्ट निर्देशानुसार मा. अतिरिक्त आयुक्त श्रीम.प्रियांका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त(मुख्यालय) श्रीम. कल्पिता पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
सदर इमारतीची स्थिती अत्यंत जीर्ण आणि अस्थिर असल्यामुळे ती परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणारी होती. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यावश्यक होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अहवालानुसार “द्वारका धाम” इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, स्थानिक प्रभाग कार्यालय आणि पोलिस प्रशासन यांच्या सहकार्याने या इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. सकाळी ८ वाजता सदर इमारतीवर तोडक कारवाईला सूरूवात करण्यात आली. खबरदारी म्हणून त्याआधी शेजारील इमारत रिक्त करण्यात आली. दुपारी 1.15 वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत परिसरात योग्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तसेच सुरळीत असलेल्या वाहतुकीला या कारवाई दरम्यान काही अडथळा होऊनये म्हणून पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला. महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना पूर्वसूचना देणे आणि इमारतीच्या आसपास योग्य प्रतिबंधक उपाययोजना केल्यामुळे या कारवाई दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही. शहरातील नागरिकांनी अशा धोकादायक इमारतीत वास्तव्य टाळावे, तसेच महापालिकेच्या सूचना व आदेश यांचे पालन करावे असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांनी केले आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी महापालिका सदैव कटिबद्ध असून अशा इमारतींबाबत तातडीने कारवाई केली जाईल.
या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागप्रमुख श्री.नरेंद्र चव्हाण,सहा.आयुक्त श्री. दत्तात्रय वरकुटे, उपअभियंता श्री.सतीश तांडेल,अतिक्रमण कर्मचारी तसेच प्रभाग क्रमांक १ ते ६ मधले फेरीवाले पथक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते.