महिला, बालके आणि ज्येष्ठांची सुरक्षितता आणि सोईसुविधांसाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मानदंड ठरेल- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालय येथील सभागृहात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा उपायुक्त करिष्मा नायर, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक आराखडा तयार करताना या ठिकाणी येणाऱ्या महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना सेवा पुरविण्याबाबत प्राधान्याने विचार व्हायला हवा. कोट्यवधींच्या संख्येने भाविक जेव्हा कुंभमेळ्यासाठी येतील तेव्हा त्यांच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत, त्यामध्ये या घटकांचा विचार व्हायला हवा. लाखोंच्या संख्येने महिला आणि बालकेही या कुंभमेळ्यात भाविक म्हणून येत असतात. त्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी तसेच इतर दिवशीही दळणवळण, निवास व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणे अपेक्षित आहे. सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात याबाबींचा समावेश व्हायला हवा.
प्रयागराज येथील कुंभमेळा व्यवस्थापनाबद्दल अधिक चर्चा झाली. त्याच पद्धतीने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा हासुद्धा गर्दी व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, दळणवळण व्यवस्था, निवास व्यवस्था आदींसाठी ओळखला जावा, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, वस्त्रांतरगृहे, हिरकणी कक्ष आदींचा समावेश आराखड्यात असावा. महिला आणि बालके गर्दीतून हरवणार नाहीत, यासाठी विशेष काळजी आणि त्या अनुषंगाने सुरक्षित वातावरण निर्मिती, हेल्पलाईन आणि मदत कक्षांची स्थापना, कुंभमेळ्यात ठिकठिकाणी स्वच्छता, नदी परिसर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, भाविकांचे आरोग्य, आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आदींबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भाविकांना अधिक काळ पायी चालत जायला लागू नये यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करणे, त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठांसाठी राखीव आसनांची व्यवस्था आदींचा अंतर्भाव करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला केली.