‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली असून 42 लाख 84 हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 96.22 टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.
राज्यात 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या महावाचन उत्सव उपक्रमामध्ये 66 हजार शाळांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत या वर्षी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली आहे. यावर्षी रिड इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांना दररोज किमान 10 मिनिटे नवीन काही वाचावे, असे आवाहन केले आहे.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे; विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे; मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे; दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासाला चालना देणे आदी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.