जंगल क्षेत्रात व शेजारील गावात वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वाघांच्या स्थलांतरासह एआयचा वापर करु – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अलिकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे असलेले क्षेत्र व या क्षेत्रात वाघांची नेमकी असलेली संख्या ही तपासून घेतली पाहिजे. जर संख्या अधिक झाली असेल तर तेथील वाघांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थानिक लोकांवर वाघांच्या होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस आमदार आशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी विवेक खांडेकर, डॉ. प्रभुनाथ शुक्ल, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आदी उपस्थित होते.
वनक्षेत्रात मोडणारी गावे व वनक्षेत्राच्या शेजारी असलेली गावे यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागासमवेत स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहभाग असलेल्या समित्यांची भूमिका अधिक महत्वाची आहे. जी गावे वनक्षेत्रात आहेत त्या गावांना चेन लिंक फेन्सिंग कशा पध्दतीने करता येईल हे तपासून घेतले जाईल. यात जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विभाग, वन विभाग आणि सीएसआर फंडच्या माध्यमातून प्रायोगिक पातळीवर एखाद्या गावाचे नियोजन करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. काही ठिकाणी वाघांना निटशी शिकार करण्याचे कसब नसल्याने केवळ ते मानवी हल्ल्याकडे वळल्याच्या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेतली. अशा वाघांची खात्री करुन त्यांना जेरबंद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे वाघ खुल्या जंगलापेक्षा गोरेवाडा सफारी येथे स्थलांतरीत करण्यास त्यांनी सांगितले.
वनक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावांमध्ये स्थानिक युवकांची निवड करुन प्राथमिक प्रतिसाद दलाबाबत विचार करण्यास त्यांनी सांगितले. या युवकांना स्वसंरक्षणासह आपातकालिन परिस्थितीत गावकऱ्यांची मदत करता यावी अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देता येईल याच बरोबर शॉक स्टिक, टॉर्च, इतर अत्यावश्यक सुविधा देऊन त्यांना मानधन तत्वावर नियुक्त कसे करता येईल हे पडताळून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास वनमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
या उपाययोजनांसह अलिकडच्या काळात एआयच्या माध्यमातून याबाबत प्रयोग करुन पाहता येतील. यात प्रामुख्याने गावाच्या सीमेत वाघ शिरल्यास आलार्म, सायरन, गावातील लोकांच्या मोबाईलवर एसएमएस संदेश पोहचविणे शक्य आहे. याबाबत भारतीय सैन्यदल व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून तंत्रज्ञानाची शक्याअशक्यता पडताळून घेण्याचे त्यांनी सांगितले. वाघाच्या हल्ल्यात पाळीव गाई व जनावरांचे जे जीव जातात त्याचे पंचनामे करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जर कसूर केला तर त्यांच्या विरुध्द कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर येथील चित्रनगरीबाबत परिपूर्ण प्रस्ताव करुन केंद्रीय मंत्री गडकरी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मार्गदर्शन घेऊ
भारताच्या मध्यवर्ती ठिकाणासह नागपूर येथे उपलब्ध असलेल्या जागतिक पातळीवरच्या सोयीसुविधा या अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. याचबरोबर नागपुरच्या आसपास वन संपदेसह जलाशय आणि विपूल नैसर्गिक उपलब्धी लक्षात घेता नागपूर येथील चित्रनगरी आर्थिकदृष्टयाही शाश्वत ठरेल. सर्व बाबींची तपशिलवार माहिती तयार करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक विभागाच्या अभ्यास गटाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर येथे चित्रनगरी उभारण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व संबधीत उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
नागपूर चित्रनगरी बाबत सांस्कृतिक कार्य विभाग व महसूल विभागाच्या टिमने जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेक आणि मौदा तालुक्यातील जागांची पाहणी केली. त्याबाबत जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
वन विकास महामंडळाच्या वेबसाईटचे लोकार्पण
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वनविकास महामंडळाच्या वेबसाईटचे लोकार्पण वन विकास महामंडळाच्या मुख्यालयात करण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वनबल प्रमुख) शोमिता बिस्वास या प्रत्यक्ष तर वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग ऑनलाईन उपस्थित होते. वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यावेळी उपस्थित होते.