
जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्या, नामशेष झाल्या. परंतु, भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले. भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य संस्कृत भाषेच्या माध्यमातून शक्य झाले. स्थापत्य, आयुर्वेद, खगोल, गणित, रसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज वारंगा येथे परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार अंतरराष्ट्रीय गुरुकुल व अंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनचे लोकार्पण व विद्यार्थी भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कुलगुरु हरेराम त्रिपाठी, संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.